साताऱ्यात घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; २७.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

साताऱ्यात घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; २७.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

सातारा :जिल्ह्यात वाढत्या घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सुमारे २७ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव महेश भिमा शिंदे (वय ३२, रा. सांगवी, ता. फलटण) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेढा परिसरात झालेल्या घरफोडीचा तपास सुरू असताना एलसीबी पथकाला संशयित चोरट्यांबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार तांत्रिक तपास करून संशयिताला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

संशयिताला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली. चौकशीदरम्यान त्याने आपल्या साथीदारांसह अनेक घरफोड्या केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यांमधून पोलिसांनी १० तोळे सोन्या-चांदीचे दागिने, एक कार, मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण २७ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलिस तपासात या टोळीने मेढा, वाई, भुईंज, फलटण ग्रामीण आणि कोरेगाव पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घरफोड्या केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या भागांतील अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सपोनि रोहित फार्णे, फौजदार परितोष दातिर तसेच एलसीबीच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

या कारवाईमुळे जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्यांवर आळा बसण्यास मदत होणार असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!