
उरीतील स्फोटात विक्रम चव्हाण यांचे देशासाठी बलिदान
मना न्यूज नेटवर्क
मलकापूर: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भीषण स्फोटात गोंडोली (ता. शाहूवाडी) येथील जवान विक्रम बाळकृष्ण चव्हाण (सध्या रा. ऐरोली, नवी मुंबई) यांना वीरमरण आले. मंगळवारी गोंडोलीसह नवी मुंबई परिसरात शोककळा पसरली आहे.
विक्रम चव्हाण (दि. ९) घडलेल्या या घटनेमुळे उरी सेक्टरमधील कमलकोट भागात भारतीय सैन्याचे जवान नियमित गस्त घालत असताना अचानक भीषण स्फोट झाला. या स्फोटात विक्रम चव्हाण गंभीर जखमी झाले. सहकारी जवानांनी तत्काळ बचावकार्य हाती घेत त्यांना हेलिकॉप्टर व विशेष लष्करी वाहनांच्या साहाय्याने श्रीनगर येथील बदामीबागमधील ९२ बेस हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही त्यांची प्राणज्योत उपचारादरम्यान मालवली.
देशसेवेचे व्रत स्वीकारलेल्या विक्रम
चव्हाण यांनी कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान दिल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह गावकऱ्यांमध्ये दुःखाचे वातावरण आहे. त्यांच्या वीरमरणामुळे गोंडोली गावाने एक शूर सुपुत्र गमावला असून, त्यांच्या बलिदानाबद्दल सर्व स्तरांतून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. विक्रम चव्हाण यांच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी नऊ वाजता गोंडोली येथे आणले जाणार आहे. या घटनेने गोंडोली परिसरावर शोककळा पसरली आहे.
तीन वर्षांची मुलगी पोरकी
शहीद जवान विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे २०१७साली मुंबई येथे भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. सध्या ते राष्ट्रीय रायफल तुकडीत कार्यरत होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण गोंडोली येथे, तर माध्यमिक शिक्षण रेठरे येथे झाले होते. सांगली जिल्ह्यातील कोकरूड येथे त्यांनी कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यांना तीन वर्षाची मुलगी आहे.


