
नीरा–पिंपरद गावातील पुलावर संरक्षण कठडा नसल्याने वारकऱ्यांची चिंता
नीरा ,
नीरा स्नानासाठी हजारो वारकरी नीरा–पिंपरद गावातील पुलावरून ये-जा करत आहेत. मात्र, या पुलावर कोणत्याही प्रकारचा संरक्षण कठडा नसल्याने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मोठ्या संख्येने भाविक आणि वारकरी या मार्गाचा वापर करत असल्याने एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विशेषतः आषाढी वारीच्या काळात या पुलावर मोठी गर्दी होत असून लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना नसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
प्रशासनाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन पुलावर संरक्षण कठडा उभारण्यासह आवश्यक सुरक्षा व्यवस्था करावी, अशी मागणी वारकरी आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वीच संबंधित विभागाने याबाबत त्वरित निर्णय घेऊन वारकऱ्यांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


