शिरवळ बसस्थानकात एमडी ड्रग्जसह युवक जेरबंद

शिरवळ बसस्थानकात एमडी ड्रग्जसह युवक जेरबंद

 १५ दिवसांत खंडाळ्यात दुसरी मोठी कारवाई

शिरवळ : खंडाळा तालुक्यात अमली पदार्थांविरोधातील कारवाया तीव्र होत असून, शिरवळ येथील एसटी बसस्थानक परिसरातून एमडी (मेफेड्रॉन) विक्रीसाठी आलेल्या एका युवकाला शिरवळ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १५ ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे. अवघ्या १५ दिवसांत खंडाळा तालुक्यात ड्रग्जविरोधातील ही दुसरी मोठी कारवाई असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव मंदार मंगेश शहाणे (वय २१, रा. शिरवळ, ता. खंडाळा) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरवळ येथील एसटी बसस्थानक परिसरात मंदार शहाणे हा एमडी (मेफेड्रॉन) विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचला.

कारवाईदरम्यान मंदार शहाणे हा ग्राहकाची वाट पाहत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांची चाहूल लागताच त्याने बुलेट मोटारसायकलवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सुमारे एक किलोमीटर पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

झडतीमध्ये त्याच्याकडून १५ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) पावडर जप्त करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी धन्यकुमार गोडसे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शिद, कीर्ती म्हस्के तसेच पोलिस अंमलदार सचिन वीर, नितीन नलावडे, अरविंद बाऱ्हाळे, सूरज चव्हाण, अजित बोऱ्हाटे, भाऊसाहेब दिघे, तुषार अभंग, संजय केंगले, संपत कांबळे आणि संतोष इंगवले यांच्या पथकाने केली.

पोलिसांकडून संशयिताकडे अमली पदार्थ कोठून आले, त्यामागील पुरवठादार कोण आहेत आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!