
पंढरपूर कॉरिडॉरचे काम जानेवारीपासून
यंदाची आषाढी यात्रा विद्यमान व्यवस्थेतील अखेरची
पंढरपूर : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी यात्रांना दरवर्षी लाखो भाविक उपस्थित राहतात. विशेषतः आषाढी यात्रेला २० लाखांहून अधिक वारकरी आणि भाविक पंढरपुरात दाखल होतात. या भाविकांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्प हाती घेतला असून, त्याचे प्रत्यक्ष काम जानेवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
आषाढी यात्रा नियोजनाच्या आढावा बैठकीसाठी रविवारी पंढरपुरात आलेल्या पालकमंत्री गोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री गोरे म्हणाले की, पंढरपूर हे राज्यातील अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून, दरवर्षी विठ्ठल दर्शनासाठी एक कोटीहून अधिक भाविक येथे येतात. या भाविकांना आधुनिक आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उज्जैन व वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉर विकसित करण्यात येणार आहे.
या प्रकल्पासाठी ३ हजार ९९३ कोटी ९० लाख रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. यंदाची आषाढी यात्रा संपल्यानंतर कॉरिडॉरच्या कामाला सुरुवात होईल. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत कामाला गती दिली जाणार असून, पुढील वर्षीची आषाढी यात्रा नव्या कॉरिडॉर व्यवस्थेत पार पडण्याची शक्यता आहे.
“पंढरपूरचे सध्याचे पारंपरिक रूप भाविकांनी डोळ्यांत साठवून ठेवावे. कारण भाविकांच्या सोयीसाठी आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन उभारले जाणारे नवे पंढरपूर लवकरच सर्वांच्या समोर येईल,” असेही पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.


