
शामगावच्या महिला ग्रामसभेत अवैध मद्यविक्री बंदीचा ठराव एकमताने मंजूर
It’s simple, just writing about your trips on a blog but you must make sure you installed FlatNews design for that blog.
कोपर्डे हवेली : शामगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित विशेष महिला ग्रामसभेत गावातील अवैध मद्यविक्रीवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. यासोबतच महिलांच्या सुरक्षेसाठी, स्वच्छता राखण्यासाठी आणि कचरा व्यवस्थापनाबाबत विविध ठरावांना देखील मंजुरी देण्यात आली.
ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच विजय पोटोळे होते. प्रारंभी ग्रामविकास अधिकारी महेश सावंत यांनी ग्रामसभेच्या नोटिसीचे वाचन केले. यावेळी सदस्य राहुल यादव, बंडा पोळ, कृष्णात पोळ, गणेश पोळ, कृषी मित्र धनाजी जाधव यांच्यासह ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
ग्रामसंघ अध्यक्षा रोहिणी पोळ, कृषी सखी शीला डांगे, सुशमा पोळ, मयुरी पोळ, शलाका पोळ, स्वाती फाटक, स्वाती पोळ आदी महिलांनी ग्रामसभेत सक्रिय सहभाग घेतला. अवैध मद्यविक्री बंदीचा ठराव सीमा पोटोळे यांनी मांडला असून त्यास मयुरी पोळ यांनी अनुमोदन दिले. उपस्थित महिलांनी हात वर करून एकमताने या ठरावाला मंजुरी दिली.
याशिवाय महिलांची सुरक्षा सुनिश्चित करणे, सार्वजनिक व सामाजिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे तसेच कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे यासंदर्भातील महत्त्वाचे ठरावही मंजूर करण्यात आले.
यावेळी सरपंच विजय पोटोळे यांनी गावात कोणत्याही प्रकारची अवैध मद्यविक्री खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट करत अशा व्यवसायात सहभागी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. तसेच ग्रामस्थांनी स्वच्छतेबाबत जागरूक राहून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
ग्रामसभेदरम्यान महिलांनी विविध विषयांवर आपली मते मांडून चर्चेत सहभाग घेतला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बंडा पोळ यांनी केले. महिलांनी घेतलेल्या या ठाम भूमिकेमुळे गावातील सामाजिक वातावरण अधिक सकारात्मक होण्यास मदत होणार असून तरुण पिढीसाठीही हा निर्णय दिशादर्शक ठरणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.


