खटावमध्ये हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा

खटावमध्ये हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा

खटाव : खटाव गावाजवळील शिरसवस्ती लगत मळवी शिवारात सुरू असलेल्या बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर पुसेगाव पोलिसांनी गुरुवारी धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत २२५ लिटर गुळमिश्रित रसायन, १० लिटर तयार हातभट्टी दारू असा एकूण १ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आला.

याप्रकरणी शरद संजय जाधव (वय ३०) याच्याविरुद्ध पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून १० लिटर गावठी हातभट्टी दारू तसेच २२५ लिटर गुळमिश्रित रसायन भरलेले नऊ प्लास्टिक बॅरल हस्तगत केले.

ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, पोलीस हवालदार विपुल भोसले, तात्यासाहेब ढोले, पोलीस कॉन्स्टेबल शंकर सुतार, दर्याबा नरळे, अविनाश घाडगे तसेच होमगार्ड विजय बकरे यांनी सहभाग घेतला.

दरम्यान, पुसेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोठेही बेकायदेशीर हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची माहिती नागरिकांनी तातडीने पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांनी केले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!