बनावट चलन सादर करून जिल्हा परिषदेची फसवणूक

बनावट चलन सादर करून जिल्हा परिषदेची फसवणूक

दोघा ठेकेदारांवर गुन्हा, काळ्या यादीत समावेश

सातारा : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागातील कामांसाठी शासनाकडे भरावयाची सुरक्षा ठेव न भरता बनावट चलन सादर करून जिल्हा परिषदेची फसवणूक केल्याप्रकरणी दोन ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जिल्हा परिषद प्रशासनाने दोघांनाही काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्याची कारवाई केली आहे.

मे २०२६ मध्ये लघू पाटबंधारे विभागांतर्गत जिल्ह्यातील पाझर तलावांच्या विविध कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यामध्ये शिंदेवाडी (ता. फलटण) येथील योगेश रविंद्र बर्गे आणि संभाजीनगर एमआयडीसी, सातारा येथील विजय बापूसाहेब घाडगे यांनी स्वतंत्र कामांसाठी सर्वात कमी दराच्या निविदा सादर केल्याने त्यांना कामे मंजूर करण्यात आली.

कामाची मंजुरी मिळाल्यानंतर दोन्ही ठेकेदारांनी सुरक्षा ठेव भरल्याचे दर्शविणारे चलन जिल्हा परिषदेकडे सादर केले. मात्र, या चलनांची पडताळणी करताना जिल्हा जलसंधारण अधिकारी अरुणकुमार दिलपाक यांच्या निदर्शनास धक्कादायक बाब आली. चलनावरील बँकेचा ‘रिसिव्हड’ शिक्का बनावट असून, बँकेच्या कॅशिअरची सहीही खोटी असल्याचे स्पष्ट झाले. तपासात संबंधित चलने बोगस असल्याचे निष्पन्न झाले.

ही माहिती दिलपाक यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम तसेच संबंधित जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संबंधित दोन्ही ठेकेदारांविरुद्ध पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचबरोबर भविष्यात जिल्हा परिषदेची कोणतीही कामे मिळू नयेत, यासाठी दोघांनाही काळ्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!