
कास धरण वाढीव पाणीपुरवठा योजनेची उदयनराजेंकडून पाहणी
सातारा : शहराला मुबलक आणि शाश्वत पाणीपुरवठा करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या कास धरण वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या जलवाहिनी कामाची खासदार Udayanraje Bhosale यांनी पाहणी केली. कास धरणाची उंची वाढवून तेथील पाणी सातारा शहरापर्यंत पोहोचविण्यासाठी उभारण्यात आलेल्या जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.
या योजनेमुळे सातारा शहराला पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार असून भविष्यात २४x७ पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीला गती मिळणार आहे. शहराची वाढती पाण्याची गरज लक्षात घेता हा प्रकल्प दूरदृष्टीचा आणि नागरिकांच्या हिताचा ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.
यावेळी पॉवर हाऊस, सांबरवाडी आणि अनावळे येथे सुरू असलेल्या विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेण्यात आला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामाच्या प्रगतीची माहिती घेण्यात आली. सर्व कामे दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
पाहणी दौऱ्यावेळी उपनगराध्यक्ष डी. जी. बनकर, पाणीपुरवठा अभियंता शहाजी वठारे, अभियंता दिग्विजय गाढवे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


