अकलूज पोलिसांची धडाकेबाज कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

अकलूज पोलिसांची धडाकेबाज कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

अकलूज,  अकलूज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अल्पावधीत तीन वेगवेगळ्या चोरी व जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत आरोपींना अटक केली असून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.

पहिल्या घटनेत, ३ जून रोजी सांगली जिल्ह्यातील एका व्यक्तीला अकलूज येथे दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी एसटी स्टँडकडे सोडण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेले. तेथे मारहाण करून त्यांच्याकडील ९९ हजार ३५० रुपये रोख रक्कम लुटण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास करून सुनील भिंगारदिवे, अजिनाथ गिरी आणि संतोष गायकवाड यांना अटक केली. आरोपींकडून लुटलेली संपूर्ण रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले.

दुसऱ्या प्रकरणात, अकलूज बसस्थानक परिसरात एका प्रवाशाच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरीला गेली होती. पोलिसांनी तपास करून सुधीर कराळे आणि शुभम चव्हाण या आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे ९४ हजार रुपयांची सोन्याची चेन हस्तगत करण्यात आली.

तिसऱ्या घटनेत, माळशिरस तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या गळ्यातील ६ ग्रॅम वजनाचा सोन्याचा दागिना हिसकावून नेण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी बालाजी पवार आणि पंडित होळकर यांना अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेला दागिना तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली.

ही सर्व कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचत पोलिसांनी गुन्ह्यांचा यशस्वी उलगडा केला आहे.

या कारवाईमुळे अकलूज परिसरातील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होणार असून पोलिसांच्या तत्पर कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज विभाग अकलुज संतोष वाळके, पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम, पो. हवा. शिवकुमार मदभावी, विक्रम घाटगे, विनोद साठे, सुहास क्षिरसागर, राहुल रणनवरे, विशाल पोरे, पोलीस अंमलदार दत्तात्रय खरात, पंडीत गवळे, प्रविण काळे यांनी कामगिरी केली आहे. तसेच सायबर पोलीस ठाणेकडील प्रविण मेटकरी, राहुल सोनकर यांचे सहकार्य केले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!