
सातारा जिल्हा पोलिस दलात मोठे फेरबदल
१० पोलिस निरीक्षक, १६ सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
सातारा,
सातारा जिल्हा पोलिस दलातील प्रलंबित बदल्यांना अखेर बुधवारी मुहूर्त लागला. जिल्ह्यातील १० पोलिस निरीक्षक आणि १६ सहाय्यक पोलिस निरीक्षकांसह अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी जारी केले. याशिवाय १५ फौजदारांच्याही जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये बदल्या करण्यात आल्या आहेत.
नवीन आदेशानुसार महेंद्र जगताप यांची खंडाळा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदी, तर महेश इंगळे यांची शिरवळ पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रदीप सूर्यवंशी यांची वाई, घनश्याम बल्लाळ यांची फलटण शहर, शीतलकुमार कोल्हाळ यांची कराड तालुका, हर्षद गालिंदे यांची महाबळेश्वर, अरुण देवकर यांची कोरेगाव, दत्तात्रय देशमुख यांची ‘जिवीशा’ शाखा, तर अरविंद काळे यांची सायबर व एएचटीयू शाखेत पोलिस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये राजेश माने यांची सातारा शहर वाहतूक शाखेत, अभिजित यादव यांची स्थानिक गुन्हे शाखेत (एलसीबी), भाऊसाहेब गोसावी यांची दहिवडी पोलिस ठाण्याच्या प्रभारीपदी, सुनील जानकर यांची औंध, संदीप साळुंखे यांची कराड वाहतूक शाखेत, राजेश माळी यांची सायबर शाखेत, अभिजित चौधरी यांची कराड शहर, तर रघुनाथ शिंदे यांची कोरेगाव पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. अन्य सहाय्यक पोलिस निरीक्षकांनाही जिल्ह्यातील विविध मोठ्या पोलिस ठाण्यांमध्ये जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
खंडाळा-शिरवळकडे लागल्या नागरिकांच्या अपेक्षा
खंडाळा आणि शिरवळ परिसरात गेल्या काही महिन्यांत खून, मारामाऱ्या, जमिनीच्या ताब्यावरून होणारे वाद तसेच अमली पदार्थांच्या वाढत्या अवैध व्यवहारांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषतः शिरवळ परिसरातील वाढत्या औद्योगिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रभावी पोलिस यंत्रणेची गरज अधोरेखित होत आहे. त्यामुळे नव्याने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांकडून गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवत सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


