शाळेचे छप्पर उडाले, घरे व वीज यंत्रणेचे मोठे नुकसान

शाळेचे छप्पर उडाले, घरे व वीज यंत्रणेचे मोठे नुकसान

परळी : परळी, ठोसेघर, सांडवली, पांगारे आणि परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आणि वादळी वाऱ्याने मोठा कहर केला आहे. डोंगरदऱ्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, घरे, शासकीय इमारती, रस्ते तसेच वीज यंत्रणेला मोठा फटका बसला असून अनेक गावांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठोसेघर परिसरातील लघु पाटबंधारे तलाव तुडुंब भरून वाहू लागले असून नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत.

शाळेचे छप्पर उडाले; शैक्षणिक साहित्याचे मोठे नुकसान

कारी येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे छप्पर रविवारी मध्यरात्री झालेल्या वादळी वाऱ्यात उडून गेले. त्यामुळे वर्गखोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी शिरून पाठ्यपुस्तके, वह्या, शालेय अभिलेख, सीसीटीव्ही यंत्रणा, संगणक साहित्य तसेच विद्युत उपकरणांचे मोठे नुकसान झाले.

सोमवारी सकाळी घटना निदर्शनास येताच ग्रामस्थ, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत उर्वरित साहित्य सुरक्षित स्थळी हलविले. शाळेच्या इमारतीचे छत आणि आतील भाग मोठ्या प्रमाणावर खराब झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिक्षण विभागाने तातडीने दुरुस्ती करून पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.

कूसखुर्द व पांगारे येथे घरांचे नुकसान

कूसखुर्द येथील चंद्रकांत मारुती देठे यांच्या घरावरील पत्रे उडून भिंती कोसळल्याने घरातील साहित्य पावसात भिजून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तर पांगारे येथील श्रीमती लक्ष्मी शंकर पवार यांच्या नव्याने बांधलेल्या घरावरील पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडाली असून घराच्या भिंतींनाही तडे गेले आहेत.

दोन्ही कुटुंबांनी प्रशासनाकडे पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांनीही नुकसानग्रस्तांना त्वरित मदत मिळावी, अशी मागणी तहसील प्रशासनाकडे केली आहे.

परळीत झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

परळी येथे डॉ. आलम मुलानी यांच्या घरासमोरील महाकाय वृक्ष कोसळल्याने सोमवारी दुपारपर्यंत वाहतूक विस्कळीत झाली होती. रस्त्यावर झाड आडवे पडल्यामुळे काही काळ वाहने थांबवावी लागली. स्थानिक नागरिक, ग्रामपंचायत कर्मचारी आणि प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नातून झाड हटविण्यात आले आणि त्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

दरम्यान, सतत सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाने नुकसानग्रस्त भागांचे तातडीने सर्वेक्षण करून मदतकार्य गतीमान करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!