कास धरण पूर्ण क्षमतेने भरले; सातारकरांची पाणीचिंता मिटली

कास धरण पूर्ण क्षमतेने भरले; सातारकरांची पाणीचिंता मिटली

सातारा :

गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सातारा शहराला पाणीपुरवठा करणारे कास धरण सोमवारी रात्री उशिरा पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे शहराच्या पश्चिम भागातील नागरिकांची पाणीटंचाईची चिंता तूर्तास दूर झाली असून लवकरच नियमित पाणीपुरवठा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कास धरणाची उंची वाढविल्यानंतर त्याची पाणीसाठा क्षमता सुमारे ०.५ टीएमसी इतकी झाली आहे. त्यामुळे यंदा शहरासाठी अधिक काळ पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. गेल्या आठवड्याभरापासून कास धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आणि सोमवारी रात्री धरण पूर्ण क्षमतेने भरले.

कास धरण हे सातारा शहराच्या पाणीपुरवठ्याचे प्रमुख स्रोत असल्याने धरण भरल्याची बातमी समजताच नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः शहराच्या पश्चिम भागातील पाणीपुरवठा आता सुरळीत होणार असल्याने सध्या सुरू असलेली पाणी कपात तातडीने बंद करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पावसाचा जोर कमी झाल्यावर पारंपरिक ‘ओटी भरण्याचा’ कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. त्यामुळे धरणाच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमाकडे नागरिकांसह लोकप्रतिनिधींचेही लक्ष लागले आहे.

 

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!