
दुचाकी आणि बिबट्याची जोरदार धडक; दुचाकीस्वार जखमी
ढेबेवाडी :
कराड-ढेबेवाडी मार्गावरील शिंदेवाडी (विंग) फाट्याजवळ शुक्रवारी रात्री दुचाकी आणि बिबट्या यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला. अपघातानंतर काही काळ रस्त्यावर बेशुद्धावस्थेत पडलेला बिबट्या शुद्धीवर येताच जंगलाच्या दिशेने पसार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, एक दुचाकीस्वार कराडच्या दिशेने जात असताना विंग-शिंदेवाडी दरम्यान त्रिमूर्ती मंगल कार्यालयासमोर अचानक बिबट्या रस्त्यावर आला. त्यामुळे दुचाकी आणि बिबट्या यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला फेकला गेला, तर बिबट्याही काही काळ रस्त्यावरच निपचित पडून राहिला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि प्रवाशांनी घटनास्थळी धाव घेत जखमी दुचाकीस्वाराला सुरक्षित ठिकाणी हलवले. दरम्यान, रस्त्यावर पडलेला बिबट्या काही वेळानंतर अचानक उठून गुरगुरत गर्दीच्या दिशेने धावल्याने उपस्थितांची एकच तारांबळ उडाली. नागरिकांच्या आरडाओरडामुळे घाबरलेल्या बिबट्याने तत्काळ डोंगराच्या दिशेने धूम ठोकली.
या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे, या भागात बिबट्यांचा वावर सातत्याने दिसून येत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. वन विभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्यांच्या वाढत्या वावरावर नियंत्रण आणावे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.


