उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ अर्जुन जाधव यांना वीरमरण

उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ अर्जुन जाधव यांना वीरमरण

मना न्यूज नेटवर्क

सातारा : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) बुधवारी (दि. १०) झालेल्या स्फोटात कराड तालुक्यातील शहापूर येथील जवान अर्जुन राजेंद्र जाधव (वय ३०) हे शहीद झाले. ते शहीद झाल्याचे समजताच शहापूर गावासह संपूर्ण कराड तालुक्यावर शोककळा पसरली

जम्मू-काश्मीर येथील उरीच्या कमलकोट भागातील लष्करी छावणीत बुधवारी (दि. १०) सकाळी अचानक ग्रेनेडचा स्फोट झाला. या स्फोटात दोन जवान गंभीर जखमी झाले. जखमी जवानांना तातडीने हवाई मार्गाने श्रीनगर येथील बदामीबाग लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अर्जुन जाधव यांची प्राणज्योत मालवली.

अर्जुन जाधव यांनी भारतीय सैन्यात नऊ वर्षे सेवा बजावली. कर्तव्यनिष्ठ, शांत स्वभाव आणि धाडसी वृत्तीमुळे ते सहकारी जवानांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते. वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी त्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले.

देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहापूरच्या या वीर सुपुत्राला फलक लावून सर्व स्तरांतून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. त्यांचे पार्थिव शुक्रवारी शहापूर येथे आणण्यात येणार असून, त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. मुलाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त ते येत्या १५ जून रोजी सुटीवर घरी येणार होते. मात्र मुलाच्या वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यापूर्वीच ते शहीद झाल्याची बातमी धडकल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहीद अर्जुन जाधव यांच्या पश्चात आई-वडील, दोन विवाहित बहिणी, पत्नी आणि एक वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!