
गुरुजींची पटसंख्या वाढविणे अन् शाळा वाचविण्यासाठी धडपड
सातारा : सरकारी आणि अनुदानित शाळांमधील घटती पटसंख्या ही शिक्षण क्षेत्रासमोरील मोठी समस्या बनली असून, शाळा टिकविण्यासाठी शिक्षक आणि मुख्याध्यापकांना मोठी धडपड करावी लागत आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताच विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शाळांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी शिक्षक गावोगावी जाऊन पालकांशी संवाद साधत आहेत. सहा वर्षे पूर्ण झालेल्या मुला-मुलींना शाळेत दाखल करण्याचे आवाहन करण्यात येत असून, अनेक ठिकाणी घरभेटी देऊन पालकांची समजूत काढली जात आहे.
सरकारी आणि अनुदानित शाळांकडून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. मोफत प्रवेश, शैक्षणिक साहित्य, गणवेश, पाठ्यपुस्तके तसेच विद्यार्थ्यांच्या ये-जा करण्यासाठी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. काही शाळांनी समाजमाध्यमांसह विविध माध्यमांतूनही प्रवेशासाठी प्रचार मोहीम सुरू केली आहे.
शिक्षण विभागाने शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी विशेष सूचना दिल्या असून, शिक्षकांना विद्यार्थी शोध मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्राथमिक, माध्यमिक तसेच निमशासकीय शाळांमधील शिक्षक गावागावांत जाऊन पालकांना आपल्या मुलांच्या प्रवेशाबाबत विनंती करत आहेत.
विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यास शाळांचे अस्तित्व टिकून राहण्यास मदत होणार असून ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्थेलाही बळकटी मिळणार आहे. त्यामुळे अनेक शिक्षक सध्या वर्गखोल्यांपेक्षा गावातील वाड्या-वस्त्यांवर अधिक दिसून येत असून, शाळा वाचविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.


