कोरेगाव-फलटण रस्त्यासाठी २०८ कोटींचा निधी

कोरेगाव-फलटण रस्त्यासाठी २०८ कोटींचा निधी

कोरेगाव : कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार कोरेगाव-फलटण रस्त्याच्या ट्रिमिक्स काँक्रीटीकरणासाठी २०८ कोटी रुपयांच्या निधीस राज्याच्या पुरवणी अंदाजपत्रकात मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे कोरेगाव ते फलटण हा प्रवास अवघ्या अर्ध्या तासात पूर्ण होणार असून शहर, बाजारपेठ आणि भाडळे खोऱ्याच्या विकासाला गती मिळणार आहे.

आमदार महेश शिंदे यांनी मतदारसंघातील रस्ते विकासाचा ध्यास घेत विविध महत्त्वाच्या प्रकल्पांना गती दिली आहे. यापूर्वी खंडाळा–जयसिंगपूर–शिरोळ राज्य मार्गाच्या ट्रिमिक्स काँक्रीटीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता. त्याअंतर्गत पिंपोडे खुर्द येथील दोस्ती ढाबा ते कोरेगाव या टप्प्यातील सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच कोरेगाव–रहिमतपूर रस्त्याचे कामही वेगाने सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर कोरेगाव ते वाठार स्टेशन हा प्रवास अधिक जलद होणार आहे.

या रस्ते प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला व इतर शेतीमाल पुणे, मुंबई, नाशिक आणि चाकण यांसारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये कमी वेळेत पोहोचवणे शक्य होणार असून कृषी अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार आहे.

उत्तर-पूर्व भागातील महत्त्वाचा हिवरे खिंडीचा मार्ग देखील अंतिम टप्प्यात असून बिचुकले-नलवडेवाडी–हिवरे किन्हई–चंचळी–खेड–नांदगिरी–तडवळे–कोरेगाव हा मार्ग सुरू झाल्यानंतर कोरेगाव ते वाठार स्टेशन हे अंतर अवघ्या २० मिनिटांवर येणार आहे.

रस्ते विकासाबरोबरच पाणी प्रश्न सोडविण्यासाठीही आमदार महेश शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. गुरुवर्य लक्ष्मणरावजी इनामदार जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजने अंतर्गत कृष्णा नदीचे पाणी रामोशीवाडी, भाडळे, नलवडेवाडी आणि तळहिरा तलावांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. या योजनेमुळे सुमारे २२ हजार ५०० हेक्टर नवीन ऊस क्षेत्र सिंचनाखाली येण्याचे उद्दिष्ट असून भाडळे खोरे आणि उत्तर भागातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!