
शेळीला वाचवताना विजेचा शॉक; आजी-नातवाचा दुर्दैवी मृत्यू
शिखर शिंगणापूर : मार्डी (ता. माण) येथील बेंदमळा परिसरात विजेच्या तारेचा शॉक लागलेल्या शेळीला वाचवण्याच्या प्रयत्नात आजी आणि नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मालन विलास काळे (वय ६०) आणि सुमीत युवराज काळे (वय १३) अशी मृतांची नावे असून या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद दहिवडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालन काळे या नातू सुमीतसोबत शेळ्या-मेंढ्या चारण्यासाठी बेंदमळा शेत परिसरात गेल्या होत्या. बुधवारी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास शेतात पडलेल्या विजेच्या तारेत एका शेळीचा पाय अडकून तिला शॉक लागला. शेळीला वाचवण्यासाठी सुमीत पुढे गेला; मात्र त्यालाही विजेचा शॉक बसला. नातवाला वाचवण्यासाठी धावलेल्या मालन काळे यांनाही शॉक लागल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत शेळीचाही मृत्यू झाला.
घटनेची माहिती मार्डीचे पोलिस पाटील आप्पासाहेब गायकवाड यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
महिनाभरापासून तार पडून होती
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, बेंदमळा परिसरात विजेची अर्थिंग वायर महिनाभरापासून पडून होती. याबाबत वारंवार माहिती देऊनही वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. वीज मंडळाच्या हलगर्जीपणामुळे दोन निष्पाप जीवांचा बळी गेल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती संबंधित वीज वितरण अधिकाऱ्यांनी दिली.


