
अभिनेत्री पूजा सावंत यांच्या गाडीला काशीळजवळ अपघात
अंगापूर : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत, अभिनेता ऋषी मनोहर यांच्या गाडीला सातारा तालुक्यातील काशीळ येथे मंगळवारी अपघात झाला. मात्र, दुर्घटना टळली असून, गाडीतील सर्वजण सुखरूप आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री पूजा सावंत, अभिनेता ऋषी मनोहर व दर्शन मुसळे हे एकाच गाडीतून सांगलीच्या दिशेने प्रवास करत होते. सातारा तालुक्यातील काशीळ परिसरात त्यांची गाडी आली असता, तिथे तीन वाहने एकमेकांवर आदळली. या विचित्र अपघातामध्ये पूजा सावंत यांच्या गाडीच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले. अपघाताची भीषणता पाहता मोठी दुर्घटना टळली. पूजा सावंत आणि ऋषी मनोहर यांना मुका मार लागला.


