
अकलूज पोलिसांची तीन गुन्ह्यांची उकल, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत
अकलूज : अकलूज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अवघ्या काही दिवसांत तीन वेगवेगळ्या चोरी व जबरी चोरीच्या गुन्ह्यांची यशस्वी उकल करत आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत रोख रक्कम, सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत.
पहिल्या प्रकरणात सांगली जिल्ह्यातील एका व्यक्तीला एस.टी. स्टँडवर सोडण्याचे आमिष दाखवून दुचाकीवरून निर्जनस्थळी नेण्यात आले. तेथे मारहाण करून त्याच्याकडील 99 हजार 350 रुपयांची रोख रक्कम जबरीने लुटण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सुनील भिंगारदिवे (रा. अकलूज), अजिनाथ गिरी आणि संतोष गायकवाड (दोघे रा. सराटी, ता. इंदापूर) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर लुटलेली रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली.
दुसऱ्या प्रकरणात अकलूज बसस्थानक परिसरात एका प्रवाशाच्या गळ्यातील 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरीला गेली होती. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गोपनीय माहितीदारांच्या मदतीने पोलिसांनी सुधीर कराळे आणि शुभम चव्हाण (दोघे रा. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) यांना अटक केली. आरोपींकडून सुमारे 94 हजार रुपयांची सोन्याची चैन हस्तगत करण्यात आली.
तिसऱ्या प्रकरणात माळशिरस तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या गळ्यातील 6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी असलेला पत्ता हिसकावून नेण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी बालाजी पवार (रा. पवारवस्ती, ता. पंढरपूर) आणि पंडित होळकर (रा. व्होळे, ता. पंढरपूर) यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीचा ऐवज आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके आणि पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली.
अकलूज पोलिसांच्या या कामगिरीमुळे परिसरातील गुन्हेगारांवर चांगलाच वचक निर्माण झाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


