माण तालुक्यात दुष्काळाची झळ तीव्र; नागरिक पशुधन टँकरवर अवलंबून

माण तालुक्यात दुष्काळाची झळ तीव्र; नागरिक पशुधन टँकरवर अवलंबून

दहिवडी, माण तालुक्यात मान्सूनपूर्व वळीवाच्या पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तालुक्यातील अनेक विहिरींनी तळ गाठल्याने तब्बल ४८ गावे व २८५ वाड्यावस्त्यांतील ६७ हजारांहून अधिक नागरिक आणि ९१ हजारांपेक्षा जास्त पशुधन सध्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून असल्याचे चित्र आहे.

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या १५ जून २०२६ च्या अहवालानुसार मंजूर असलेले सर्व ५० टँकर कार्यरत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात गावोगावी पाणीपुरवठा सुरळीत होत आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. टँकरच्या खेपा नियमित होत आहेत का, तसेच टँकरवरील जीपीआरएस यंत्रणा कार्यरत आहे का, याची तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

हस्तनपूर गावात सहा दिवसांपासून पाणी न आल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली असून, अनेक भागांत पाणीपुरवठ्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. शासनाच्या निकषानुसार नागरिक व पशुधनाला पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक असताना काही गावांना अजूनही प्रतीक्षा करावी लागत असल्याचे वास्तव आहे.

दहिवडी, बिजवडी, पाचवड, पांगरी, येळेवाडी, मोगराळे, वडगाव, जाधववाडी, तोंडले, शिंगणापूर, अनभुळेवाडी, थदाळे, मोही, दानवलेवाडी, हस्तनपूर, डंगिरेवाडी, वावरहिरे, संभुखेड, कारखेल, वरकुटे-म्हसवड, पर्यंती, धळूदेव, पळशी, पिंगळी बुद्रुक, पिंगळी खुर्द, माडी, इंजबाव, खटुबाव, भालवडी, पानवण, विरळी, शिरवली, वारुगड, कुळकजाई, सत्रेवाडी, उकिडवे, कोळेवाडी, परकंदी, शिंदी बुद्रुक, टाकेवाडी, सरूपखानवाडी, पांढरवाडी, कुकुडवाड, दोरगेवाडी, पुकळेवाडी, चिलारवाडी आणि वळई या गावांसह २८५ वाड्यावस्त्यांपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. काही ठिकाणी दिवसाआड तर काही भागांत दिवसाला दोन ते तीन खेपा कराव्या लागत आहेत.

पशुधनालाही टँकरचाच आधार

दुष्काळाची भीषणता पशुधनाच्या स्थितीतूनही स्पष्ट होत आहे. पिंगळी खुर्द, टाकेवाडी, संभुखेड, इंजबाव, पळशी, परकंदी, विरळी आणि कुकुडवाड परिसरात जनावरांसाठी स्वतंत्र टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. पाण्याअभावी जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

पेरण्या रखडल्या; शेतकऱ्यांची चिंता वाढली

वळीवाचा पाऊस न झाल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतातील मशागतीची कामे पूर्ण करून पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. मान्सून अपेक्षेपेक्षा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे.

चारा व पाण्याच्या टंचाईमुळे अनेक शेतकरी जनावरे विकण्याच्या तयारीत असून, परिस्थिती अशीच कायम राहिल्यास गुरांच्या छावण्या सुरू करण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.

प्रशासनासमोर मोठे आव्हान

माण तालुक्यातील हजारो कुटुंबांचे आजचे वास्तव म्हणजे पावसाची प्रतीक्षा आणि टँकरची वाट पाहणे झाले आहे. विहिरींचे तळ उघडे पडले असून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. दमदार पाऊस लवकर न झाल्यास टंचाई आणखी भीषण होण्याची शक्यता व्यक्त होत असून प्रशासनासमोर पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मात्र निसर्गाची अवकृपा असतानाही प्रशासनाकडून टँकरद्वारे दारोदारी पाणी पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू असल्याने सध्या तरी नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!