
बनावट सोन्याच्या बांगड्या तारण ठेवून १०.३५ लाखांची फसवणूक
सातारा : बनावट हॉलमार्क आणि कॅरेटचे शिक्के असलेल्या बांगड्या अस्सल सोन्याच्या असल्याचा बनाव करून त्या तारण ठेवत इमार्क्स फायनान्स कंपनीची १० लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २५ मार्च रोजी दुपारी सुमारे १२.१५ वाजल्यापासून ते २६ जूनदरम्यान पंताचा गोट येथील इमार्क्स फायनान्स कंपनीच्या शाखेत उघडकीस आली. संशयितांनी बनावट सोन्याच्या बांगड्यांवर हॉलमार्क व कॅरेट दर्शवणारे शिक्के मारून त्या खऱ्या सोन्याच्या असल्याचा भास निर्माण केला. त्यानंतर त्या बांगड्या कंपनीकडे तारण ठेवून १० लाख ३५ हजार रुपयांचे कर्ज मिळवून कंपनीचा विश्वासघात करत आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी इमार्क्स फायनान्स कंपनीचे कर्मचारी श्रीकांत दिलीपराव भोईटे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोमनाथ भुजंगराव बाबर (रा. साबळेवाडी, ता. सातारा) आणि उमेश शशिकांत शिंदे (मूळ रा. कोरेगाव, जि. सातारा; सध्या रा. चिंतामणी सोसायटी, पोतदार मिलजवळ, मुंबई) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार माने करत आहेत.


