
रहिमतपूर-कराड मार्गाच्या काँक्रीटीकरणासाठी २८६ कोटींचा निधी
सातारा,
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. रहिमतपूर-वाठार-हेळगाव-मसूर-कराड या प्रमुख मार्गाच्या काँक्रीटीकरणासाठी राज्य शासनाने २८६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
या निधीमुळे कराड उत्तरमधील वाहतूक अधिक वेगवान होण्यास मदत होणार असून, रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. काँक्रीट रस्त्यामुळे स्थानिक नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच व्यावसायिकांना सुरक्षित आणि सुखकर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
आमदार मनोजदादा घोरपडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर राज्य शासनाने या महत्त्वाच्या रस्त्यासाठी निधी मंजूर केला.
याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार घोरपडे म्हणाले, “कराड उत्तर हा भौगोलिकदृष्ट्या मोठा मतदारसंघ असून ग्रामीण भागातील दळणवळण अधिक गतिमान होणे आणि पर्यटनाला चालना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे या रस्त्याचे काँक्रीटीकरण अत्यावश्यक होते. २८६ कोटी रुपयांच्या निधीमुळे मतदारसंघाच्या विकासाला नवी दिशा मिळेल. उर्वरित रस्त्यांसाठीही निधी मिळविण्याचे प्रयत्न सुरू असून महायुती सरकार कराड उत्तरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे.”


