कंटेनरमध्ये ४०० किलोहून अधिक जिलेटिन व अमोनियम नायट्रेटचा साठा

कंटेनरमध्ये ४०० किलोहून अधिक जिलेटिन व अमोनियम नायट्रेटचा साठा

सातारा : सातारा शहरालगतच्या खिंडवाडी परिसरात एका खाणीजवळ उभ्या असलेल्या कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणावर जिलेटिनच्या कांड्या आणि अमोनियम नायट्रेटचा साठा आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून स्फोटक साहित्याची मोजदाद गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

गुरुवारी दुपारी या साठ्याची माहिती पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांना मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले, पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे आणि नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तातडीने खिंडवाडी येथे धाव घेतली.

घटनास्थळी पाहणी करताना पोलिसांना कंटेनरचा केवळ मोठा बॉक्स उभा असल्याचे आढळले. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जिलेटिनच्या कांड्या साठविलेल्या असल्याचे उघड झाले. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) आणि फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

प्राथमिक तपासानुसार, कंटेनरमध्ये ४०० किलोहून अधिक जिलेटिन आणि अमोनियम नायट्रेटचा साठा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या दोघांकडे पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य शहरालगत कशासाठी ठेवण्यात आले होते, त्यासाठी आवश्यक परवानगी होती का, हा साठा नेमका कोणाचा आहे आणि तो कुठून आणण्यात आला, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिस या सर्व बाबींचा तपास करत असून तपासानंतरच स्फोटक साहित्याचा उद्देश आणि त्यामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!