
कराड बसस्थानक परिसरात प्रवाशांना लुटणारे पती-पत्नी जेरबंद
कराड,
कराड बसस्थानक परिसरात प्रवाशांना लक्ष्य करून लुटमार करणाऱ्या पती-पत्नीला कराड शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले असून चौकशीत आणखी तीन गुन्ह्यांची उकल झाल्याची माहिती राजश्री पाटील यांनी दिली.
अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे श्रावण राजेश कांबळे (वय ३३) आणि पुनम श्रावण कांबळे (वय २७, रा. बैलबाजार परिसर, कराड) अशी आहेत. दोघांना न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
२२ जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास कराड बसस्थानक परिसरात एक महिला पायी जात असताना, ती एकटी असल्याची संधी साधून संशयितांनी तिला अडविले. ठार मारण्याची धमकी देत महिलेला ढकलून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून दोघांनी घटनास्थळावरून पलायन केले.
घटनेनंतर पीडित महिलेच्या फिर्यादीवरून कराड शहर पोलिसांनी तपास सुरू केला. फिर्यादीने दिलेले वर्णन आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटवून त्यांना कराड शहरातून ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.
या कारवाईत दत्तात्रय दराडे, विजय गोडसे तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे निखिल मगदुम यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांच्या चौकशीत संशयितांकडून आणखी तीन गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपास सुरू आहे.


