दारूचे बिल मागितल्याचा राग; साताऱ्यात बिअर बारमध्ये राडा

दारूचे बिल मागितल्याचा राग; साताऱ्यात बिअर बारमध्ये राडा

 मॅनेजरच्या डोक्यात बाटली फोडली

सातारा : दारूचे बिल काऊंटरवर भरण्यास सांगितल्याच्या कारणावरून साताऱ्यातील एका बिअर बारमध्ये चौघांनी धुडगूस घालत मॅनेजरवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. संशयितांनी दारूच्या बाटल्या फोडून नुकसान केले तसेच गोळ्या घालण्याची धमकी दिल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी साहील रणदिवे, रोशन यादव, आदित्य वाघमारे आणि रुद्र अवघडे (सर्व रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत अक्षय गोरखनाथ वाघमळे (वय ३२, सध्या रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जून रोजी मतकर कॉलनी परिसरातील बिअर बारमध्ये ही घटना घडली. अक्षय वाघमळे हे संबंधित बारमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. संशयितांनी मद्यप्राशन केल्यानंतर त्यांना ३,२५० रुपयांचे बिल काऊंटरवर भरण्यास सांगितले. याचा राग आल्याने त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली.

वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संशयितांनी शिवीगाळ करत गोळ्या घालण्याची धमकी दिली. त्यानंतर मॅनेजरच्या डोक्यात दारूची बाटली फोडून त्यांना जखमी केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत काऊंटरवरील दारूच्या बाटल्याही फोडून नुकसान केले.

या घटनेमुळे बार परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. शाहूपुरी पोलिसांनी संबंधित चौघांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!