
धोम धरण बॅक वॉटरमधील २९ गावांच्या पुनर्वसनाला गती
वाई : धोम धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रात वर सरकून वसलेल्या २९ गावांतील नागरिकांच्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाशी संबंधित नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या निर्देशानंतर या गावांसाठी आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्त, पुणे आणि जिल्हाधिकारी, सातारा यांना देण्यात आले आहेत.
सातारा जिल्ह्यातील सन १९७६ पूर्वीच्या कोयना, धोम, वीर, कण्हेर आणि येरळवाडी प्रकल्पग्रस्त पुनर्वसन वसाहतींना ज्या धर्तीवर नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, त्याच धर्तीवर धोम धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रातील गावांनाही सुविधा देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.
धोम धरणाच्या बॅक वॉटर भागातील नागरिकांच्या वतीने २९ जून २०२५ रोजी मंत्री मकरंद पाटील यांना निवेदन देण्यात आले होते. त्यामध्ये पुनर्वसन अधिनियम अस्तित्वात येण्यापूर्वी धोम धरणाचे काम सुरू झाल्याने त्या काळात प्रभावी पुनर्वसन व्यवस्था उपलब्ध नव्हती. त्यामुळे अनेक कुटुंबांनी दूरस्थ पुनर्वसन स्वीकारण्याऐवजी मूळ परिसरातील उंच भागात स्थलांतर करून नवीन गावठाणे वसविली. मात्र, या गावांना आजपर्यंत रस्ते, पाणीपुरवठा, सार्वजनिक इमारती, अंतर्गत सुविधा आणि इतर मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागल्याची बाब निवेदनातून मांडण्यात आली होती.
प्रशासनाने प्रस्ताव तयार करण्याच्या प्रक्रियेला गती दिल्याने या गावांतील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागणीला न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर संबंधित गावांमध्ये आवश्यक नागरी सुविधांची कामे हाती घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
या निर्णयाचा लाभ धोम, वेलंग, आसरे, पानस, रेणावळे, खावली, वडवली, वाशिवली, कोंढावळे, वासोळे, भिवडी, गोवे, आसगाव, कोंढवली, परतवडी, बलकवडी, वयगाव, दह्याट, बोरगाव खुर्द, धावली, मालतपूर, मुगाव, न्हाळेवाडी, बोरिव, व्याहळी, दसवडी, चिखली (मोरजीवाडा), आकोशी, नांदगणे आणि बोरगाव बुद्रुक या गावांना होणार आहे.
या मागणीसाठी माजी सभापती चंद्रकांत शेलार, संतोष कोंढाळकर, सुरेश सणस (दाजी) आणि पंकज वाडकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.


