शासकीय इतमामात जवान तुषार भिलारे यांना अखेरचा निरोप

शासकीय इतमामात जवान तुषार भिलारे यांना अखेरचा निरोप

अमर रहे’च्या घोषणांनी पवारवाडी परिसर दुमदुमला

सायगाव,

जावली तालुक्यातील पवारवाडी येथील सुपुत्र तथा भारतीय सैन्यात कार्यरत असलेले जवान तुषार राजेंद्र भिलारे (वय ३४) यांचे झाडावरून पडून झालेल्या अपघातात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ‘अमर रहे… अमर रहे… तुषार भिलारे अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

तुषार भिलारे हे मध्यप्रदेशातील महू येथे भारतीय सैन्यात कार्यरत होते. काही दिवसांच्या रजेवर गावी आले असताना झाडावरून पडल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच पवारवाडीसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली.

बुधवारी पार्थिव गावी दाखल होताच आनेवाडीपासून सजविलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीतून अंत्ययात्रा काढण्यात आली. मार्गावरील प्रत्येक गावात नागरिकांनी अश्रुपूर्ण वातावरणात जवानाला अखेरचा सलाम केला. ‘तुषार भिलारे अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने युवक, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रांतील नागरिक सहभागी झाले होते.

पवारवाडीत पार्थिव पोहोचल्यानंतर अंतिम दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. स्मशानभूमीत भारतीय सैन्य, सातारा पोलीस दल आणि प्रशासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून शासकीय मानवंदना देण्यात आली. त्यानंतर बंदुकीच्या तीन फैरी झाडून वीर जवानाला अखेरचा सलाम करण्यात आला.

यावेळी तहसीलदार प्रवीण मुदगल, मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, भारतीय सैन्याचे अधिकारी व जवान, जिल्हा सैनिक कल्याण बोर्डाचे अधिकारी, सातारा पोलीस दलाचे अधिकारी व कर्मचारी, मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अंत्यसंस्कारावेळी जवान तुषार भिलारे यांच्या आई-वडिलांसह पत्नी, दोन मुली आणि कुटुंबीयांचा आक्रोश उपस्थितांना हेलावून गेला. देशसेवेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या या वीर जवानाला अखेरचा निरोप देताना संपूर्ण पवारवाडी गावाने अश्रुपूर्ण वातावरणात मानवंदना अर्पण केली.

 

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!