
आंबेनळी घाटातील दरड हटवून वाहतूक पूर्ववत
महाबळेश्वर,
महाबळेश्वर शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. दमदार पावसामुळे आंबेनळी घाटातील पोलादपूर हद्दीत दरड कोसळून मोठा राडारोडा रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, पोलादपूर प्रशासनाने तातडीने यंत्रसामग्रीच्या सहाय्याने दरड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.
यंदाच्या पावसाची सुरुवात तुलनेने संथ झाली असली, तरी गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. गतवर्षी १ जून ते १ जुलै या कालावधीत १,५०७.८० मिमी (५९.३६२ इंच) पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र याच कालावधीत केवळ ४७०.२८ मिमी (१८.५२ इंच) पाऊस झाला आहे. जून महिन्याचा पहिला पंधरवडा जवळपास कोरडाच गेल्याने महाबळेश्वरकरांसह शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. आता मात्र पावसाने दमदार हजेरी लावल्याने दिलासा मिळाला आहे.
बुधवारी दिवसभर रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. या पावसामुळे वेण्णा तलावाच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली असून, आणखी काही दिवस असाच पाऊस कायम राहिल्यास जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पावसामुळे खरीप हंगामातील शेतीच्या कामांनाही वेग आला आहे. दुसरीकडे, वर्षा पर्यटनालाही सुरुवात झाली असून, विशेषतः शनिवार-रविवारी मोठ्या संख्येने पर्यटक महाबळेश्वरकडे येत आहेत. पावसामुळे हिरवागार झालेला निसर्ग, धुक्याची चादर आणि धबधब्यांचे मनोहारी दृश्य पर्यटकांना आकर्षित करत आहे.


