चार सराईत आरोपी जेरबंद, दोन गावठी पिस्तुले जप्त

चार सराईत आरोपी जेरबंद, दोन गावठी पिस्तुले जप्त

फलटण : फलटण ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने धाडसी कारवाई करत चार सराईत आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून दोन गावठी पिस्तुले, एक जिवंत काडतूस, तीन मोबाईल फोन आणि एक पल्सर मोटारसायकल असा सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस उपनिरीक्षक राजकुमार भुजबळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकाला कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. दुधेबावी आणि परिसरात आरोपींचा शोध सुरू असताना संशयित पल्सर मोटारसायकलवरून जाताना आढळले.

पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला असता आरोपींनी विविध भागांतून पळ काढण्याचा प्रयत्न केला. तब्बल सहा तास सुरू असलेल्या या थरारक पाठलागानंतर दुधेबावी परिसरात आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. आरोपींकडून एक पिस्तूल हस्तगत करण्यात आले. चौकशीत आणखी एक गावठी पिस्तूल विकल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आणखी दोन संशयितांचा शोध घेऊन त्यांनाही अटक करण्यात आली.

या कारवाईत प्रतीक प्रमोद खुंटे, प्रदीप उर्फ सोन्या संतोष गोरे, करण कानीफ घोलप आणि समीर उर्फ वर्धन बाळासो खवळे या आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात हे आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले असून त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.

फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या सूचनांनुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने तातडीने हालचाली करून आरोपींना जेरबंद केले.

गेल्या तीन महिन्यांत गुन्हे प्रकटीकरण पथकाने केलेली ही पाचवी मोठी कारवाई असून, संभाव्य गंभीर गुन्हे रोखण्यात पोलिसांना यश आल्याने नागरिकांकडून पथकाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!