
कराड तालुक्यातील शिवडेत घरफोडी; 5.06 लाखांचा ऐवज
उंब्रज : कराड तालुक्यातील शिवडे (बालाजीनगर) येथे रविवारी मध्यरात्री घरफोडीची धक्कादायक घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून 2 लाख 70 हजारांची रोख रक्कम तसेच 2 लाख 36 हजार 800 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 5 लाख 6 हजार 800 रुपयांचा ऐवज लंपास केला.
याप्रकरणी संजय गुलाबराव भोसले यांनी उंब्रज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रविवारी (दि. 28) पहाटे सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी घराच्या टेरेसवरील सिमेंटच्या दरवाजाची कडी उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर आईच्या बेडरूममधील टेबलच्या ड्रॉवरचे लॉक तोडून त्यामध्ये ठेवलेली 2 लाख 70 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.
याशिवाय दोन सोन्याच्या चैन, सोन्याच्या रिंगा, चांदीचे वाळेतोडे, अन्नपूर्णा देवीची चांदीची मूर्ती, चांदीचे निरंजन आणि चांदीचे पैंजण असा एकूण 2 लाख 36 हजार 800 रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
घटनेची माहिती मिळताच उंब्रज पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.


