एमडी ड्रग्जचे खंडाळा कनेक्शन उघड; अहिरेतील पाच जणांवर गुन्हा

एमडी ड्रग्जचे खंडाळा कनेक्शन उघड; अहिरेतील पाच जणांवर गुन्हा

खंडाळा,
पुण्यातील हिंजवडी येथे जप्त करण्यात आलेल्या ११ लाख ५५ हजार ५०० रुपयांच्या एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे थेट सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यापर्यंत पोहोचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात खंडाळा तालुक्यातील अहिरे गावातील काही संशयितांचा सहभाग समोर आला असून, त्यांच्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात आणखी ३ लाख रुपयांच्या एमडी ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये अहिरे गावच्या माजी उपसरपंचाचाही समावेश असल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

हिंजवडीतील मुक्ताईनगर परिसरात ११ जून रोजी एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आणल्याच्या संशयावरून पोलिसांनी अक्षय प्रदीप धायगुडे (३१), दयानंद उत्तम धायगुडे (३८) आणि महेश पुनाराम किचड ऊर्फ बिश्नोई (२१, सर्व रा. अहिरे, ता. खंडाळा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून ६१.७० ग्रॅम एमडी ड्रग्ज, एक चारचाकी वाहन आणि तीन मोबाईल फोन असा एकूण ११ लाख ५५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चौकशीदरम्यान अशपाक ऊर्फ मोन्या काझी (रा. अहिरे) आणि हनुमान किलेरी ऊर्फ बिश्नोई (रा. खंडाळा) यांची नावे समोर आली. त्यानंतर हिंजवडी अमली पदार्थ विरोधी पथकाने खंडाळा तालुक्यातील संशयितांच्या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत त्यांच्या रूममधून २८.४४ ग्रॅम एमडी ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला. या ड्रग्जची किंमत २ लाख ८४ हजार ४०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अक्षय धायगुडे, दयानंद धायगुडे, महेश किचड ऊर्फ बिश्नोई, अशपाक ऊर्फ मोन्या काझी आणि हनुमान किलेरी ऊर्फ बिश्नोई या पाच जणांविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, ड्रग्ज तस्करीचे जाळे खंडाळा तालुक्यापर्यंत पोहोचल्याचे उघड झाल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार आणि पुरवठादारांचा शोध घेण्यासाठी हिंजवडी पोलिसांची तपासमोहीम सुरू आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!