फलटण शहराला  १८ जूनपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा

फलटण शहराला १८ जूनपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा

मना न्यूज नेटवर्क
फलटण : नीरा उजवा कालवा १२ जूनपासून बंद झाल्याने फलटण शहरात पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर फलटण नगर परिषद प्रशासनाने १८ जूनपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे जाहीर प्रकटन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

धरण क्षेत्रात अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे कालवा बंद करण्यात आला असून तो सुमारे ४५ दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. सध्या नगरपरिषदेच्या साठवण तलावात उपलब्ध असलेला पाणीसाठा मर्यादित असल्याने उपलब्ध पाण्याचे नियोजनबद्ध वितरण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार सोमवार पेठ, मंगळवार पेठ, महतपुरा व जिंती नाका परिसरात सम तारखांना, तर उर्वरित शहरभागात विषम तारखांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले असून वाहन धुणे, अंगण धुणे तसेच इतर अनावश्यक कारणांसाठी पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन केले आहे.

उपलब्ध पाणीसाठा अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. नीरा उजवा कालवा बंद राहणार असल्याने पुढील काही आठवडे पाणीपुरवठ्यावर ताण राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून नागरिकांनी पाण्याचा जबाबदारीने वापर करणे ही काळाची गरज बनली आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!