लोणंदमध्ये दारू तस्करीचा पर्दाफाश

लोणंदमध्ये दारू तस्करीचा पर्दाफाश

सातारा,

लोणंद परिसरातून १४ चाकी ट्रकमधून होत असलेली विदेशी मद्याची बेकायदा वाहतूक राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाच्या सातारा व कोल्हापूर विभागाच्या संयुक्त कारवाईत उघडकीस आली. या कारवाईत सुमारे २ कोटी ९४ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शफिक रशिद शहा (वय ३९, रा. मध्य प्रदेश) असे आहे.

एक्साईज विभागाच्या भरारी पथकाला २० जून रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की, सातारा-निरा मार्गावर लोणंद (ता. खंडाळा) येथून एका १४ चाकी ट्रकमधून विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे विभागाने सापळा रचून संबंधित ट्रक अडवला.

ट्रकची तपासणी केली असता सुरुवातीला प्लास्टिक सिरॅमिकची १५० पोती आढळून आली. मात्र, त्यामागे लपवून ठेवलेला मोठा मद्यसाठा सापडला. त्यामध्ये पोलंड प्राईड व्हिस्की (१८० मि.ली.) चे ८३४ बॉक्स आणि रॉयल क्लासिक माल्ट व्हिस्की (१८० मि.ली.) चे ६७२ बॉक्स, असे एकूण १,५०६ बॉक्स विदेशी मद्य आढळून आले.

जप्त करण्यात आलेल्या मद्याची बाजारमूल्य १ कोटी ७१ लाख ४ हजार ३२० रुपये असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रकही ताब्यात घेण्यात आला आहे. त्यामुळे एकूण २ कोटी ९४ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई कोल्हापूर विभागाचे उपआयुक्त विजय चिंचाळकर आणि सातारा विभागाचे अधीक्षक बाबासाहेब भूतकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत अधिकारी किरण पवार, माधव चव्हाण, योगेश फटांगरे, अजय पाटील, विजय मरोड आणि कैलास छत्रे यांनी सहभाग घेतला.

या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!