करंडीत दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोचा प्रादुर्भाव

करंडीत दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोचा प्रादुर्भाव

सातारा,

सातारा तालुक्यातील करंडी येथे गावच्या विहिरीचे दूषित पाणी पिल्यामुळे तब्बल २५ हून अधिक नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गत महिन्यात याच गावात दूषित पाण्यामुळे अनेकांना काविळीची लागण झाली होती. आता पुन्हा विहिरीत मोठ्या प्रमाणावर मृत मासे आढळून आल्याने ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करंडी गावाला केटी बंधाऱ्याजवळ बांधण्यात आलेल्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो. या विहिरीत प्रमाणापेक्षा जास्त पोटॅशियम टाकण्यात आल्याने सुमारे ५० किलोहून अधिक मासे मृत झाल्याचे सांगितले जात आहे. मृत माशांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, जवळील शाळा व हॉटेलमधील सांडपाणीही विहिरीच्या परिसरात सोडले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामपंचायतीने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत पाणीपुरवठा सुरू ठेवल्याने गावातील लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक नागरिकांना आरोग्याच्या तक्रारी निर्माण झाल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून अनेक कुटुंबे पिण्यासाठी जारचे पाणी विकत घेत असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांत नागरिकांचा त्रास वाढल्याने कुमठे प्राथमिक आरोग्य केंद्र व पंचायत समितीच्या आरोग्य विभागाला याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर रविवारी आरोग्य विभाग आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन पाणीपुरवठा केंद्र तसेच काही नागरिकांच्या घरांची पाहणी केली. प्राथमिक तपासणीत पाणी दूषित असल्याचे आढळून आल्याची माहिती मिळाली आहे.

अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला पाण्याची टाकी तातडीने स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या असून नागरिकांनी पाणी उकळूनच प्यावे, असा सल्ला दिला आहे. तसेच पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

नागरिकांची मागणी

गावातील विहिरीची तातडीने स्वच्छता करून पाणीपुरवठा व्यवस्था सुरक्षित करावी, तसेच दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!