पाचगणीत मोठी दुर्घटना टळली; कारवर झाड कोसळूनही चालक बचावला

पाचगणीत मोठी दुर्घटना टळली; कारवर झाड कोसळूनही चालक बचावला

पाचगणी : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाचगणीत बुधवारी मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर अचानक वडाचे आणि आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळून एका कारवर पडले. सुदैवाने चालक नितीन बेलोशे हे थोडक्यात बचावले.

नितीन बेलोशे यांची एमएच-११ बीव्ही ५९२५ क्रमांकाची वॅगनआर कार पाचगणीकडून वाईकडे जात असताना ही घटना घडली. झाडाचा काही भाग कारच्या समोरील बोनेटवर तर काही भाग मागील बाजूस पडल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले. प्रसंगावधान राखत बेलोशे यांनी वाहन मागे घेतल्याने जीवितहानी टळली. त्याचवेळी तेथून जाणारा एक दुचाकीस्वारही थोडक्यात बचावला.

झाड कोसळताना रस्त्यालगतच्या एका टपरीचेही नुकसान झाले. तसेच विद्युत तारा तुटल्याने परिसरात काही काळ गोंधळ उडाला. झाड रस्त्यावर आडवे पडल्याने पाचगणीतील मुख्य मार्गावरील वाहतूक जवळपास दोन तास ठप्प झाली. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

अवघ्या काही सेकंदांचा फरक पडला असता तर ही घटना जीवघेणी ठरली असती. या घटनेनंतर शहरातील धोकादायक वृक्षांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!