
एसटीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; चालकाविरोधात गुन्हा
वडूज, खटाव तालुक्यातील कातरखटाव-एनकुळ मार्गावर एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी एसटी बस चालकाविरोधात वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत युवकाचे नाव महेश बाबासो मदने (वय ३५, रा. कणसेवाडी) असे आहे. तर तुळशीराम दादासो रणसिंग (रा. वडूज) या एसटी चालकाविरोधात निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश मदने हे त्यांच्या दुचाकीवरून (क्र. एमएच ४३ डब्ल्यू १६०८) कातरखटाव-एनकुळ रस्त्याने घरी जात होते. सोलर प्लांटच्या गेटसमोर एनकुळकडून कातरखटावच्या दिशेने येणाऱ्या खातवळ-वडूज एसटी बसने (क्र. एमएच १४ एनई ५२८७) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात महेश मदने यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी मयताचे चुलतभाऊ सुनील बबन मदने यांनी वडूज पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस नाईक पी. एल. जगदाळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


