
अतित येथे एक्साईजचा छापा; ३६ हजारांची देशी-विदेशी दारू जप्त
सातारा,
सातारा तालुक्यातील अतित येथे राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाने छापा टाकून देशी व विदेशी दारूच्या बाटल्यांचा साठा जप्त केला. दुचाकीवरून बेकायदा दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश काशिनाथ सुतार (वय २४) आणि सुरज संतोष यादव (वय २७, दोघे रा. अतित, ता. सातारा) अशी संशयितांची नावे आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला समर्थगाव, अतित येथे बेकायदा विदेशी दारूची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार विभागाच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला. कारवाईदरम्यान संशयितांकडून देशी व विदेशी दारूच्या एकूण १८६ बाटल्या, अंदाजे ३६ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक अजय पाटील, तसेच विजय मरोड आणि बाळासो पाचुंदे यांनी केली.
दरम्यान, जिल्ह्यात बनावट दारू, हातभट्टी दारूची निर्मिती, विक्री किंवा वाहतूक तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या बेकायदा मद्यव्यवहाराची माहिती नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला द्यावी, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


