मायणीत स्फोटकांचा मोठा साठा जप्त; १८०० जिलेटिन कांड्या

मायणीत स्फोटकांचा मोठा साठा जप्त; १८०० जिलेटिन कांड्या

खटाव :

मायणी (ता. खटाव) येथील गरवारे वस्तीत स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) सातारा आणि वडूज पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेला स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत १८०० जिलेटिन कांड्या, सुमारे ८ हजार डिटोनेटर्स आणि इतर स्फोटक साहित्यांसह १७ लाख ९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्यात विशाल लक्ष्मण जाट, बारुलाल लक्ष्मण जाट (सध्या रा. मायणी, मूळ राजस्थान) आणि शंकर बेनीराम चौधरी (रा. मायणी) यांच्याविरोधात वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

एलसीबीचे हवालदार अजित करणे यांनी दिलेल्या खबरी जबाबानुसार, एलसीबीचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार हवालदार अजित करणे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पवार, स्वप्निल दौंड तसेच वडूज पोलिसांचे उपनिरीक्षक एस. एस. शिंदे, हवालदार चव्हाण, कॉन्स्टेबल काळेल, चव्हाण आणि सहकाऱ्यांनी मध्यरात्रीनंतर सुमारे सव्वाबारा वाजता गरवारे वस्ती येथे छापा टाकला.

छाप्यादरम्यान घटनास्थळी दोन चारचाकी वाहने आणि दोन संशयित व्यक्ती आढळल्या. चौकशीदरम्यान संशयितांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने पोलिसांनी पंचांसमक्ष वाहनांची झडती घेतली. वाहनांमध्ये खाकी रंगाचे अनेक बॉक्स आढळून आले. त्यावर स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीचे नाव इंग्रजीत नमूद असल्याचे दिसून आले.

यानंतर सातारा नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS), फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकाच्या मदतीने वाहनांमध्ये स्फोटके असल्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर दोन्ही चारचाकी वाहने, एक ४०७ वाहन, जिलेटिन कांड्या, डिटोनेटर्स, कार्टेक्स आणि सेफ्टी फ्यूज सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईत पोलिसांनी १८०० जिलेटिन कांड्या, ८ हजार डिटोनेटर्स आणि इतर स्फोटक साहित्य असा एकूण १७ लाख ९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास वडूज पोलिसांकडून सुरू आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!