3 कोटींचे विनातारण कर्ज मिळवून देण्याचे आमिष 6.36 लाखांची फसवणूक

3 कोटींचे विनातारण कर्ज मिळवून देण्याचे आमिष 6.36 लाखांची फसवणूक

सातारा : सातार्‍यातील एका बांधकाम व्यावसायिकाला कोणतेही तारण न घेता 3 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 6 लाख 36 हजार 800 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी निता नितीन घोडके (रा. सदरबझार, सातारा) हिच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, राजेंद्र तुकाराम गायकवाड (वय 50, रा. गोडोली, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 ऑक्टोबर 2024 ते 28 जून 2026 या कालावधीत ही घटना घडली. फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक असून, त्यांच्या बांधकाम प्रकल्पासाठी मोठ्या रकमेच्या कर्जाची आवश्यकता होती. त्यावेळी संबंधित महिला ‘ऐश्वर्या फायनान्स कंपनी’ मार्फत विनातारण 3 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचा दावा करत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी तिच्याशी संपर्क साधला.

महिलेने एका महिन्याच्या आत कर्ज मंजूर करून देण्याचे आश्वासन देत आवश्यक कागदपत्रे घेतली. त्यानंतर कर्ज प्रक्रियेचे शुल्क, प्रोसेसिंग फी आणि इतर खर्चाच्या नावाखाली वेळोवेळी ऑनलाइन व्यवहारातून 6 लाख 36 हजार 800 रुपये घेतले.

मात्र, पैसे भरूनही दीर्घकाळ कर्जाची रक्कम मिळाली नाही. याबाबत वारंवार विचारणा केल्यानंतरही संबंधित महिलेने टाळाटाळ केल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. अखेर त्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!