तरुणांची दिंडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शांत मारुती दिंडीचा विठ्ठल भक्तीचा अखंड वारसा

तरुणांची दिंडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शांत मारुती दिंडीचा विठ्ठल भक्तीचा अखंड वारसा

हडपसर,

संतांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या शांत मारुती दिंडी सोहळ्याने गेली अनेक वर्षे वारकरी संप्रदायाची परंपरा जपली आहे. १९९० मध्ये सुरू झालेल्या या दिंडीची १९९५ मध्ये नोंदणी झाली असून, आजही ही दिंडी भक्ती, संस्कार आणि समाजप्रबोधनाचे कार्य करत आहे. दिंडीचे चालक हभप. उत्तम महाराज शेलार यांनी दिंडीच्या कार्याची माहिती दिली.

वैैकुंठवासी नगरसेवक हभप. शरद आप्पा लेवे यांच्या प्रेरणेतून शांत मारुती आणि गारेचा गणपती मंदिरात भजनाच्या माध्यमातून या दिंडीची मुहूर्तमेढ रोवली गेली. दरवर्षी सुमारे तीनशे वारकरी या दिंडीत सहभागी होतात. वारीदरम्यान सर्वजण भौतिक सुखांचा आणि दैनंदिन व्यापाचा विसर पडून विठ्ठलनामात तल्लीन होतात. दिंडीतील शिस्त आणि व्यवस्थापन विशेष उल्लेखनीय आहे. दिंडीत चार ओळींमध्ये वारकरी चालतात. सर्वांत पुढे पताका, त्यानंतर टाळकरी, मृदंग, वीणा-तुळस आणि हंडावाली यांचा समावेश असतो. त्यापाठोपाठ महिला वारकरी शिस्तबद्धपणे एका रांगेत चालतात. दिंडीत पाऊल्या, संगीत भारूड, नामस्मरण, प्रवचन आणि कीर्तन यांसारखे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

शांत मारुती वैष्णव दिंडी मालक ह भ प विजय लेवेशांत मारुती वैष्णव दिंडी चालक ह भ प उत्तम महाराज शेलार

भोजनासाठी स्वतंत्र आचारी असतो. त्याला महिला आणि पुरुष वारकरी मदत करतात. मुक्कामासाठी तंबू आणि टेंटची व्यवस्था केली जाते, तर वैद्यकीय सुविधा शासनाकडून उपलब्ध करून दिल्या जातात. शांत मारुती दिंडीमध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असून युवकांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे या दिंडीला “तरुणांची दिंडी” म्हणून ओळखले जाते. युवकांना वारकरी संप्रदायाचे संस्कार मिळावेत यासाठी त्यांचे प्रबोधन केले जाते. टाळ, मृदंग, भजन आणि कीर्तनाची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. मात्र, बदलत्या काळात दिंडीसमोर काही आव्हानेही उभी ठाकली आहेत. मुक्कामाच्या गावांचा वाढता विस्तार आणि जागेची कमतरता यामुळे तंबू उभारण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.

पूर्वी  कंदील आणि साधे भोजन असायचे; आता त्यांची जागा वाहनांनी, जनरेटरने आणि विविध आधुनिक सुविधांनी घेतली आहे. “तरुणांना सुसंस्कार मिळवण्यासाठी वारी आवश्यक आहे,” असा संदेश हभप. उत्तम महाराज शेलार यांनी दिला. वारकरी संप्रदायामुळे स्वतःसह संपूर्ण कुटुंब निर्व्यसनी झाले असून, अनेक वारकऱ्यांना व्यसनमुक्त करण्याचे कार्यही त्यांनी केले आहे. वारीतील एक अविस्मरणीय अनुभव सांगताना त्यांनी बरड मुक्कामानंतर पहाटे चार वाजता ट्रकचा ब्रेक फेल झाल्याची घटना सांगितली. त्या ट्रकमध्ये सुमारे पंचवीस जण होते. “त्या क्षणी माझा थरकाप उडाला होता; मात्र माऊलीच्या कृपेने मोठा अनर्थ टळला,” असे त्यांनी नमूद केले.

पुढील काळात समाजात परमार्थ आणि अध्यात्म वाढावे, यासाठी प्रवचन आणि कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा संकल्प शांत मारुती दिंडीने केला आहे. जातीभेद विसरून भजनाचा आनंद घेणे आणि भौतिक सुखांचा त्याग करणे, हाच विठ्ठल भक्तीचा खरा अर्थ असल्याचे मत हभप. उत्तम महाराज शेलार यांनी व्यक्त केले. वारकरी संप्रदायाची शिकवण आजच्या समाजासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी सांगितले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!