चाकूने हाताची नस कापत युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न; सातारा बसस्थानक परिसरात खळबळ

चाकूने हाताची नस कापत युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न; सातारा बसस्थानक परिसरात खळबळ

सातारा : सातारा शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शुक्रवारी भरदुपारी एका युवकाने धारदार चाकूने स्वतःच्या डाव्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. गंभीर रक्तस्राव झालेल्या अवस्थेत युवक बसस्थानक परिसरात फिरत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बसस्थानक परिसरात या युवकाने स्वतःच्या हातावर चाकूने वार करून नस कापली. त्याच्या हातात धारदार चाकू असल्याने मदतीसाठी पुढे जाण्यास नागरिकही घाबरत होते. काही नागरिकांनी धाडस दाखवत युवकाला समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र तो त्यांच्यापासून दूर पळत होता.

दरम्यान, बसस्थानक परिसरातून स्टेडियम रोड आणि राधिका रोडच्या दिशेने युवकाची धावपळ सुरू होती. रक्तबंबाळ अवस्थेतील युवकाला पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही जणांनी या घटनेचा व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रित केला.

अखेर स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत युवकाला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडील धारदार चाकू बाजूला केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. युवकाला शांत करून रक्तस्रावाच्या अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या युवकाने कोणत्या कारणातून स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मानसिक तणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!