कराड-खंडाळ्यात हातभट्टी अड्यांवर धडक कारवाई; १७ आरोपी ताब्यात

कराड-खंडाळ्यात हातभट्टी अड्यांवर धडक कारवाई; १७ आरोपी ताब्यात

कराड : अवैध हातभट्टी दारूनिर्मिती तसेच ताडी, देशी व विदेशी मद्याच्या बेकायदा विक्रीवर आळा घालण्यासाठी सातारा पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तपणे राबविलेल्या विशेष मोहिमेत मोठी कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत १४ ठिकाणी छापे टाकून तब्बल ३ लाख ७२ हजार ८८० रुपयांचा अवैध मद्यसाठा व साहित्य जप्त करण्यात आले असून १७ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिस अधीक्षक निखील पिंगळे आणि राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक बाबासाहेब भूतकर यांच्या आदेशानुसार ११ ते १३ जून दरम्यान ही विशेष मोहीम राबविण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वारुंजी फाटा, हजारमाची, तासवडे (ता. कराड) तसेच म्हावशी (ता. खंडाळा) येथे एकाचवेळी धाडसत्र राबवले. या कारवाईत अनिल लक्ष्मण कदम, राहुल सोपान पडळकर, राजू मारुती पवार आणि पंकज मुकेश पाटील या चौघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ९० लिटर ताडी, देशी व विदेशी मद्य तसेच एक दुचाकी जप्त करण्यात आली.

दरम्यान, फलटण, कराड, वाई-महाबळेश्वर आणि सातारा विभागांत तीन दिवसांत एकूण १४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवायांमध्ये १३ आरोपींकडून ५७ लिटर देशी व विदेशी मद्य, ताडी तसेच हातभट्टी दारू निर्मितीसाठी लागणारे रसायन जप्त करण्यात आले.

ही कारवाई पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके, उत्पादन शुल्क निरीक्षक माधव चव्हाण, निरीक्षक बापूसाहेब डोणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजयकुमार पाटील, उमा पाटील, संतोष पाटील, नितीन जाधव आणि त्यांच्या पथकाने केली.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!