
कराडजवळ पुणे-बंगळूर महामार्गावर पावसाचे तळे
कराड : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम गेल्या तीन वर्षांपासून संथ गतीने सुरू असून, प्रमुख गावे आणि शहरांजवळील उड्डाणपूल अद्याप अपूर्ण असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने महामार्ग प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटी पुन्हा एकदा उघड केल्या आहेत.
कराड शहरालगतच्या मलकापूर आणि नांदलापूर परिसरात अवघ्या तासाभराच्या पावसात सेवा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. अनेक ठिकाणी रस्त्यांना अक्षरशः तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. मलकापूरच्या पूर्व आणि पश्चिम बाजूच्या सेवा रस्त्यांवरही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली.
उड्डाणपूलाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. परिणामी, सर्व वाहने सेवा रस्त्यांवरूनच मार्गक्रमण करत आहेत. मात्र पावसामुळे या रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आणि अनेक वाहनचालकांना तासन्तास अडकून पडावे लागले.
साचलेल्या पाण्यात अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने बंद पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. स्थानिक नागरिकांनाही दैनंदिन ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मागील दोन ते अडीच वर्षांच्या पावसाळ्यातही अशीच परिस्थिती वारंवार उद्भवत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
दरम्यान, पावसाळा सुरू होण्याच्या उंबरठ्यावर असतानाही महामार्गालगतच्या नाल्यांची सफाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदार कंपनीने जलनिस्सारण व्यवस्थेकडे दुर्लक्ष केल्यामुळेच सेवा रस्त्यांवर पाणी साचत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.
स्थानिकांनी तातडीने नाल्यांची सफाई करून जलनिस्सारण व्यवस्था सुधारण्याची तसेच अपूर्ण उड्डाणपूलाचे काम वेगाने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. आगामी पावसाळ्यात अशीच परिस्थिती कायम राहिल्यास वाहतुकीसह नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


