
महाबळेश्वरच्या धुक्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ट्रॅक्टर सफर
बाळासाहेब ठाकरे चौकासाठी ७५ लाखांचा निधी
महाबळेश्वर : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वर दौऱ्यात कौटुंबिक पूजेनिमित्त कुटुंबीयांसोबत निवांत वेळ घालवला. दाट धुके, रिमझिम पाऊस आणि आल्हाददायक वातावरणात त्यांनी नातू रुद्रांश याच्यासोबत ट्रॅक्टरवरून सफर करत पावसाळ्याचा आनंद लुटला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे हेही उपस्थित होते.
मुंबईतील पावसाळी अधिवेशनाच्या धावपळीतून काही क्षण विश्रांती मिळावी म्हणून उपमुख्यमंत्री शिंदे बुधवारी पहाटे खासगी दौऱ्यावर महाबळेश्वरमध्ये दाखल झाले. त्यांचे कुटुंबीय एक दिवस आधीच येथे आले होते. कौटुंबिक पूजेनंतर त्यांनी परिसरात वेळ घालवत निसर्गाचा आनंद घेतला.
दौऱ्यादरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांनी महाबळेश्वर बाजारपेठेत फेरफटका मारत पर्यटकांशी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत छायाचित्रांसाठीही पोझ दिली. तसेच जिल्हा परिषद सदस्य अजित संकपाळ, शहरप्रमुख विजय नायडू, अर्बन बँकेचे संचालक सतीश ओंबळे, सचिन गुजर आणि सचिन कदम यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली.
दरम्यान, महाबळेश्वर शहरातील हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे चौकाच्या सुशोभीकरणासाठी शिवसैनिक व अर्बन बँकेचे संचालक सतीश ओंबळे यांनी मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निधीची मागणी केली. त्यावर शिंदे यांनी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्याची घोषणा केली. याशिवाय महाबळेश्वर शहरासाठी अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.


