
पॅरोलवर बाहेर आल्यानंतर सहा वर्षे फरार; सातारा एलसीबीने केले जेरबंद
सातारा,
पत्नीच्या खूनप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोल रजेवर बाहेर येऊन कारागृहात परत न फिरकलेल्या आरोपीला सातारा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अखेर जेरबंद केले. तब्बल सहा वर्षांपासून फरार असलेला हा आरोपी वेशांतर करून सातारा शहरात वावरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शाहूपुरी परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
भरत कांतीलाल ओसवाल (रा. गुलमोहोर कॉलनी, शाहूपुरी, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीच्या खूनप्रकरणात भरत ओसवाल याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तो कोल्हापूर येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. पॅरोलवर ४५ दिवसांसाठी बाहेर आल्यानंतर कोरोनाकाळात त्याच्या रजेची मुदत वाढविण्यात आली होती. मात्र, २०२२ मध्ये कारागृहात हजर राहणे बंधनकारक असतानाही तो परतला नाही. त्यानंतर कळंबा कारागृह प्रशासनाने त्याला फरार घोषित करून शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी संचित व पॅरोल रजेवर जाऊन नियोजित तारखेला कारागृहात परत न आलेल्या बंदींचा शोध घेऊन त्यांना पुन्हा कारागृहात दाखल करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक आरोपीचा शोध घेत होते.
अनेक महिन्यांच्या गुप्त तपासानंतर आरोपी सातारा शहरात वेशांतर करून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शाहूपुरी परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी संबंधित कारागृह प्रशासनाच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वेशांतर करून बदलत होता ठिकाण
एलसीबीच्या तपासात भरत ओसवाल हा ओळख लपविण्यासाठी वारंवार वेशांतर करत असल्याचे निष्पन्न झाले. तो सतत वास्तव्याचे ठिकाण बदलत असल्याने त्याचा माग काढणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले होते. तपास पथकाने त्याच्या जुन्या संपर्कांचे विश्लेषण केले. नातेवाईक, मित्रमंडळी तसेच गुप्त माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीची पडताळणी करण्यात आली. आरोपी अधूनमधून जवळच्या व्यक्तींशी संपर्क साधत असल्याचा धागा मिळाल्यानंतर त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली आणि अखेर शाहूपुरी परिसरातून त्याला अटक करण्यात यश आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि एलसीबीचे पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, प्रवीण फडतरे, अविनाश चव्हाण, सुजित भोसले, रोहित निकम आणि महेश निर्मळ यांनी केली.


