फलटण तालुक्यात पाण्यासाठी वणवण

फलटण तालुक्यात पाण्यासाठी वणवण

आदर्की (ता. फलटण) : फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात यंदा वळवाच्या पावसाने हुलकावणी दिल्याने डोंगराळ आणि माळरान पट्ट्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परिसरातील ओढे, नाले, पाणवठे आणि अनेक विहिरी कोरड्या पडल्याने वन्यजीवांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. विशेषतः वानर आणि माकडांचे कळप मोठ्या प्रमाणावर गावांकडे येत असल्याचे चित्र दिसत आहे.

दरवर्षी वळवाच्या पावसामुळे डोंगररांगांमध्ये आणि माळरान भागात काही प्रमाणात पाण्याची उपलब्धता निर्माण होत असते. मात्र यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने नैसर्गिक जलस्रोत आटले आहेत. परिणामी वनक्षेत्रातील प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मानवी वस्त्यांचा आधार घ्यावा लागत आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनेक गावांतील विहिरी, पाण्याच्या टाक्या आणि शेतातील पाणवठ्यांवर वानरांचे कळप दिसून येत आहेत. तहान भागविण्यासाठी ही माकडे विहिरींच्या कडेला बसून पाणी पित असल्याचे तसेच घरांच्या परिसरात फिरताना दिसत आहेत. याशिवाय मोर, ससे, रानपक्षी आणि इतर वन्यजीवदेखील पाण्याच्या शोधात गावांकडे वळत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

वन्यजीवांच्या वाढत्या वावरामुळे काही ठिकाणी नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, पाण्याअभावी हे प्राणी गावांकडे येत असून त्यांना त्रास न देता पाण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. गावांमध्ये सार्वजनिक ठिकाणी पाण्याची भांडी किंवा टाक्या ठेवून वन्यजीवांना दिलासा देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, पावसाअभावी केवळ वन्यजीवच नव्हे तर शेतकरी वर्गही चिंतेत आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर पाण्याची कमतरता जाणवत असल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आता मान्सूनच्या पावसाकडे लागल्या आहेत. आगामी काही दिवसांत चांगला पाऊस झाला नाही, तर टंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!