७० फूट खोल विहिरीत पडलेल्या बैलजोडीला ग्रामस्थांनी दिले जीवदान

७० फूट खोल विहिरीत पडलेल्या बैलजोडीला ग्रामस्थांनी दिले जीवदान

दहिवडी,
माण तालुक्यातील पिंगळी बुद्रुक येथे ग्रामस्थांच्या धाडस आणि एकजुटीमुळे ७० फूट खोल विहिरीत पडलेल्या बैलजोडीचे प्राण वाचल्याची हृदयस्पर्शी घटना घडली. या घटनेमुळे काही काळ परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

पिंगळी बुद्रुक येथील शेतकरी राहुल विजय जगदाळे यांनी अवघ्या तीन दिवसांपूर्वी नवीन बैलजोडी खरेदी केली होती. शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास जगदाळे यांच्या शेतात कुळवटीचे काम सुरू असताना अचानक एका बैलाचा पाय घसरला. त्यामुळे औतासह दोन्ही बैल तब्बल ७० फूट खोल विहिरीत कोसळले.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी धावले. विहीर खोल असल्याने बैलांना बाहेर काढण्याचे सुरुवातीचे प्रयत्न अपयशी ठरले. विहिरीत अडकलेल्या बैलांचा आक्रोश आणि मालकाची असहाय्यता पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.

अखेर दहिवडी येथून क्रेन मागविण्यात आली. त्यानंतर काही धाडसी तरुणांनी जीवाची पर्वा न करता विहिरीत उतरून बैलांच्या पोटाखाली मजबूत पट्टे बांधले. क्रेनच्या सहाय्याने अत्यंत सावधगिरीने दोन्ही बैलांना विहिरीबाहेर काढण्यात आले.

या बचाव मोहिमेत एका बैलाला किरकोळ दुखापत झाली असली तरी दोन्ही बैल सुखरूप असल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला. ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे आणि धाडसी तरुणांच्या साहसामुळे मोठी दुर्घटना टळल्याने परिसरातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!