कृष्णा नदीत रासायनिक पाण्याचा विसर्ग?  नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

कृष्णा नदीत रासायनिक पाण्याचा विसर्ग? नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

कराड,
कराड तालुक्यातील तासवडे, वहागाव, बेलवडे हवेली, घोणशी, खोडशी आदी परिसरातून वाहणाऱ्या कृष्णा नदीत दुर्गंधीयुक्त रासायनिक पाणी सोडण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रदूषित पाण्यामुळे नदीतील हजारो मासे व अन्य जलचर प्राण्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गेल्या चार दिवसांपासून कृष्णा नदीच्या पाण्यातून तीव्र दुर्गंधी येत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. नदीत मिसळलेल्या कथित रासायनिक पाण्यामुळे नदीकाठचा संपूर्ण परिसर दुर्गंधीने त्रस्त झाला असून नदीतील जैवविविधतेवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उंब्रज, वराडे, तासवडे, बेलवडे हवेली, वहागाव, घोणशी, खोडशी तसेच कराड परिसरातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत कृष्णा नदी आहे. नदीकाठावर उभारलेल्या जॅकवेलमधून पाणी उचलून गावांना पुरवठा केला जातो. त्यामुळे प्रदूषित पाणी थेट नागरिकांच्या वापरात येण्याची शक्यता निर्माण झाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील दवाखान्यांमध्ये उलट्या, जुलाब आणि कावीळसदृश आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या प्रदूषणाचा आणि नागरिकांच्या आरोग्याचा संबंध तपासण्याची मागणीही पुढे येत आहे.

दरम्यान, या प्रकाराबाबत संबंधित यंत्रणांनी तातडीने पाण्याचे नमुने तपासून प्रदूषणास जबाबदार असलेल्या घटकांचा शोध घ्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण यंत्रणेने घटनास्थळी भेट देऊन वस्तुस्थितीचा अहवाल जाहीर करावा, अशीही मागणी होत आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!