डीपीवरील शॉर्टसर्किटमुळे उसाला आग; दहा गुंठ्यांतील पीक जळून खाक

डीपीवरील शॉर्टसर्किटमुळे उसाला आग; दहा गुंठ्यांतील पीक जळून खाक

कराड : तालुक्यातील शिरवडे येथील बागरान शिवारात विद्युत डीपीवरील शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतकरी गणपती शिंदे यांचे सुमारे दहा गुंठे क्षेत्रावरील ऊस पीक जळून खाक झाले. गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून यात शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतालगत असलेल्या विद्युत डीपीवर अचानक शॉर्टसर्किट झाल्यानंतर ठिणग्या उसाच्या शेतात पडल्या. त्यानंतर काही क्षणांतच उसाने पेट घेतला. जोरदार वाऱ्यामुळे आगीने झपाट्याने रौद्ररूप धारण केले आणि ऊस पिकाचा मोठा भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले. त्यामुळे आग शेजारील शेतांमध्ये पसरण्यापासून रोखली गेली आणि संभाव्य मोठी हानी टळली.

नुकसानभरपाईची मागणी

या आगीत ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी गणपती शिंदे यांनी तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच विद्युत डीपीवरील बिघाडामुळे ही घटना घडल्याने संबंधित यंत्रणांनी जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्युत डीपी, वीजवाहिन्या आणि इतर विद्युत उपकरणांची नियमित तपासणी व देखभाल करून अशा दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!